प्रेमसंबंधांचा थरारक शेवट! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने तृतीयपंथीयाचा गळा आवळून मृतदेह जाळला
जळगाव (प्रतिनिधी):
पोलीस भरती प्रशिक्षणादरम्यान झालेली ओळख, त्यानंतर फुललेले प्रेम आणि लग्नाच्या तगाद्यातून झालेला टोकाचा वाद… यातून एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या तृतीयपंथीय प्रेयसीची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील पद्मालय जंगलात उघडकीस आली आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत चातुर्याने तपास करत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ओळख, प्रेम आणि लग्नाचा तगादा
स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१, रा. पहूर, ता. जामनेर) हा २०२४ मध्ये नाशिक येथे पोलीस भरतीची तयारी करत होता. तिथे एका नाश्त्याच्या गाडीवर त्याची ओळख आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे (रा. छत्तीसगड, सध्या रा. सुरत) हिच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, मात्र आकांक्षा ही तृतीयपंथीय असल्याचे समोर आल्यावर स्वप्निलने तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, आकांक्षाने लग्नाचा तगादा लावत थेट स्वप्निलचे घर गाठले. “दुसऱ्या मुलीशी लग्न कर, पण माझ्याशीही लग्न कर,” असा विचित्र प्रस्ताव तिने मांडल्याने स्वप्निल प्रचंड मानसिक तणावाखाली होता.
पद्मालयच्या जंगलात रचला मृत्यूचा सापळा
आकांक्षाचा पिच्छा सोडवण्यासाठी स्वप्निलने तिला संपवण्याचा कट रचला. ३१ जानेवारी रोजी त्याने तिला सुरतवरून जळगावला भेटीसाठी बोलावले. दुपारी दोघे दुचाकीने पद्मालय येथे गेले. तिथे गणपतीचे दर्शन घेतल्यावर ते जवळच्या जंगलात गप्पा मारण्यासाठी गेले. तिथे पुन्हा लग्नावरून वाद झाला. संतापलेल्या स्वप्निलने आकांक्षाला खाली पाडून तिच्याच ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. ती मेल्याची खात्री पटल्यावर, त्याने स्वतःच्या दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्या शरीरावर ओतले आणि तिला पेटवून देऊन तिथून पळ काढला.
पोलिसांचा ‘बियरच्या बाटली’वरून तपासाचा मार्ग
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळी पोलिसांना बियरच्या बाटल्या आढळल्या. त्यावरील ‘बॅच नंबर’वरून पोलिसांनी दुकानाचा शोध घेतला. त्या दुकानात आकांक्षाने बियर खरेदीसाठी ‘ऑनलाइन पेमेंट’ केले होते. या तांत्रिक पुराव्यावरून तिची ओळख पटली. तसेच तिच्या पायाचे नेलपॉलिश आणि नाकातील मुरणीवरून खात्री झाली.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने आरोपी जेरबंद
पद्मालय मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस पहूर येथील स्वप्निल पाटीलपर्यंत पोहोचले. ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या यशस्वी तपासात पीएसआय सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, ईश्वर पाटील आणि पहूर पोलीस स्टेशनचे विनोद पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
