Friday, December 12, 2025
Homeक्राईमआगीचे रौद्ररूप : एमआयडीसीतील ठिबक कंपनीला भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान

आगीचे रौद्ररूप : एमआयडीसीतील ठिबक कंपनीला भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान

🔥 आगीचे रौद्ररूप : एमआयडीसीतील ठिबक कंपनीला भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान

सात ते आठ बंबांनी आणली आग आटोक्यात 

जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसीच्या ‘के’ सेक्टरमधील ठिबक नळ्या तयार करणाऱ्या साई किसान या कंपनीला बुधवार १० डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत ठिबक नळ्यांचे साहित्य या मशिनरी जळाल्या. आग लागल्याचे लक्षात येताच काम करणाऱ्या 25 ते 30 व कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर धाव घेतल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

प्लास्टिक उत्पादन असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट आकाशाला भिडले. दरम्यान कंपनीच्या गोदामाकडे आग वेगाने पसरत असतानाच बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट झाला आणि आगीची तीव्रता आणखी वाढली. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तत्काळ परिसरातील वीज पुरवठा खंडित केला, मात्र अंधार आणि धधावपळीमुळे मदतकार्याला अडचणी आल्या.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी विनय गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.

आग विझवण्यासाठी जळगाव महापालिकेचा बंब आणि भुसावळ, वरणगाव, नशिराबाद तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणचे बंबांसह एकूण ४ पेक्षा अधिक अग्निशामक बंबांनी दोन तासाहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न केले. तरीही आगीची तीव्रता एवढी होती की शेजारच्या दोन कंपन्यांनाही झळ बसल्याचे समजते.

कंपनीचे मालक जगन्नाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी ट्रान्सफॉर्मर आणि कट-आऊट बदलण्यात आले होते. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी शॉर्टसर्किट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताज्या बातम्या