जळगाव,( प्रतिनिधी,); – नागपूर येथे रविवारी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील आणि भुसावळचे चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले संजय सावकारे यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. या तीनही मंत्र्यांच्या राजकीय कारकीर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा…
भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन
भाजपचे संकटमोचक मंत्री म्हणून गिरीश महाजन यांची राज्यात ओळख निर्माण झाली आहे तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सरपंच पदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. जामनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच ते 1995 मध्ये विजयी झाले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. 2024 ला त्यांनी सातत्याने निवडून येत सातव्यांदा विजयश्री खेचून आणली.
राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून 2014 मध्ये तर 2016 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री 2022 मध्ये ग्राम विकास व पर्यटन मंत्री अशा विविध खात्यांची मंत्रिपदे त्यांनी समर्थपणे सांभाळली आहेत. भाजप उमेदवारांसह महायुतीच्या उमेदवारांना 2024 च्या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रात मोठे यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भाजपाचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख.
शिवसेनेची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील
खानदेशची मुलुख मैदान तोफ आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी राज्यभरात ओळख असणारे गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पाळधी
या छोट्याशा गावातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. शिवसेनेकडून पहिल्यांदा 1999 मध्ये एरंडोल विधानसभा मतदार संघात उमेदवारी दाखल करून विजय मिळवला व पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर 2009 मध्ये त्यांचा गुलाबराव देवकर यांनी पराभव केला. मात्र हा अपवाद वगळता त्यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातून सातत्याने विजय मिळवला असून ते 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राहिले.
2016 मध्ये सहकार राज्यमंत्री आणि 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामधील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिला. तसेच 2022 मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे पुन्हा पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पद मिळाले. शिवसेना पक्षाचे राज्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार निवडून आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका.
संजय सावकारे
भुसावळ विधानसभा मतदारसंघातून संजय वामन सावकारे हे सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. भुसावळ मतदार संघाचे तत्कालीन आमदार असलेले संतोष चौधरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांचा सक्रिय राजकारणात सहभाग. राष्ट्रवादी काँग्रेस कडून 2009 मध्ये पहिल्यांदा उमेदवारी करून विजय प्राप्त केला. यानंतर 2014 मध्ये भाजपात प्रवेश करून 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केला.
राज्याच्या तत्कालीन आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात 2013 मध्ये ते कृषी व सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री राहिले आहेत. अनुसूचित जाती साठी राखीव मतदार संघातून सलग चौथ्यांदा विजय झाला असून भाजपचे निष्ठावंत आणि मंत्री पदाचा अनुभव असल्याने त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी.