विजेच्या धक्क्याने बाप–लेकीचा मृत्यू : लहान भाची गंभीर
मास्टर कॉलनी येथील घटना ; महावितरणवर संतापाची लाट
जळगाव प्रतिनिधी शहरातील मास्टर कॉलनी परिसर आज शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास हृदय हेलावून टाकणाऱ्या दुर्घटनेने हादरला. गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीला उच्चदाब वाहिनीने शॉक बसल्याने झालेल्या साखळी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील बाप व लेकीचा मृत्यू झाला, तर भाची गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या दुर्लक्षावर संताप उसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनी येथील मौलाना साबीर खान नवाझ खान (वय ३८) हे कुटुंबासह राहतात. शुक्रवारी सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांची भाची मारिया फतेमाबी (वय ९) ही गच्चीवर कपडे टांगत असताना घरालगतून गेलेल्या उच्चदाबाच्या तारेचा तिला जबर धक्का बसला. भाची अडचणीत असल्याचे पाहताच मोठी मुलगी आलिया (वय १२) तिला वाचवण्यासाठी धावली; मात्र तिलाही विजेचा प्राणघातक स्पर्श झाला.
यानंतर मुलगी आणि भाचीला मदत करण्यासाठी मौलाना साबीर खान स्वतः पुढे सरसावले. पण त्यांनाही जोरदार विद्युतप्रवाहाचा फटका बसला. यात साबीर खान आणि मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी मारियाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साबीर खान यांचा लहान मुलगा मात्र थोडक्यात बचावला.
महावितरण अधिकाऱ्यांना नागरिकांचा जाब : गुन्हा दाखल करण्याची मागणी
दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिक संतापाने संतप्त झाले. आ. राजूमामा भोळे, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, फारूक शेख यांनी महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. उच्चदाब वाहिनी हटवण्याची मागणी महिन्यांपासून प्रलंबित असून दुर्लक्ष केल्यानेच ही जीवघेणी घटना घडल्याचे नागरिकांनी ठणकावले. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महावितरणच्या दुर्लक्षामुळेच घटना?
दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. महावितरण कंपनीवर गंभीर आरोप करताना नागरिकांनी सांगितले की, घराजवळून जाणारी उच्चदाब वाहिनी हटवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली होती. मात्र, महावितरणने दुर्लक्ष केल्यानेच ही भयंकर दुर्घटना झाली.
