जैन इरिगेशनला नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेसचे कॉर्पोरेट सदस्यत्व
जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी): शाश्वत शेती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभरात नावारूपाला आलेली जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनी आता नॅशनल अकॅडमी ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS) ची प्रतिष्ठित कॉर्पोरेट सदस्य झाली आहे. या सदस्यत्वामुळे कंपनीला कृषी संशोधन व विकासाच्या क्षेत्रात नवे आयाम गाठण्याची संधी मिळणार असून, शेतकऱ्यांसाठीही हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
१९९० मध्ये स्थापन झालेली NAAS संस्था ही भारतातील कृषी संशोधन, शिक्षण व धोरणांसाठी अग्रगण्य वैज्ञानिक थिंक-टँक मानली जाते. सध्या संस्थेत ८२१ सदस्य आहेत, परंतु कॉर्पोरेट सदस्य म्हणून जैन इरिगेशन ही देशातील एकमेव कंपनी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
या भागीदारीबद्दल जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “NAAS सोबतचे सहकार्य आमच्या शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपायांना चालना देईल आणि भारतीय कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यास मदत करेल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासह राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.”
मागील सहा दशकांपासून ठिबक सिंचन, सौर ऊर्जा व शाश्वत कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम बनविणाऱ्या जैन इरिगेशनला आता NAAS च्या वैज्ञानिक नेटवर्कचा लाभ होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, या सहकार्यामुळे जलसंधारण, जलसुरक्षा आणि शाश्वत शेतीतून उत्पादकता वाढवण्यास मोठी मदत होईल.