Tuesday, February 10, 2026
Homeक्राईमइनोव्हा कार उलटली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

इनोव्हा कार उलटली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

इनोव्हा कार उलटली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

पाचोरा–जळगाव महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा–जळगाव महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कार (एम.एच. १७ बी.एल. ८८०८) ने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पाचोरा–जळगाव महामार्गावरील हॉटेल पांडुरंग गार्डनजवळ, बिल्दी फाट्याच्या परिसरात हा भीषण अपघात घडला. वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात उलटल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या अपघातात पिंप्राळा येथील प्रसन्न रवींद्र निमजे (वय २३) आणि श्रीरंग सुरेश पाटील (वय २७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रोहित सोनार (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. तसेच निखिल कच्छवा (वय २५), अनिकेत कोळी (वय २२) आणि नीलेश वाघ (वय २३) हे तरुणही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील आणि किशोर लोहार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर कारचे दरवाजे अडकल्याने कारचा पत्रा तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, वाहनाला आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, हे लक्षात येताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाणी टाकून मोठा अनर्थ टाळला.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या अपघातातील मयत श्रीरंग पाटील यांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून श्रीरंग हे कुटुंबातील एकमेव आधार होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या