बंगळुरू येथे आठ महिन्याच्या चिमुकलीला विषाणूची लागण
नवी दिल्ली वृत्तसंस्था :- चीनमध्ये कोरोनानंतर आता HMPV व्हायरस दहशत निर्माण करत आहे. हा विषाणू वेगाने पसरत असून त्यामुळे अनेक देश सतर्क आहेत. आता भारतातही या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या मुलामध्ये हा विषाणू आढळून आला. मुलाला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बंगळुरूमध्ये HMPV चा पहिला रुग्ण आढळला असून एका आठ महिन्यांच्या बाळाला याची लागण झाली आहे. बंगळुरूच्या खासगी रुग्णालयात याबाबत चाचणी करण्यात आली होती. यामध्ये या लहानगीला HMPV चं संक्रमण झाल्याचं समोर आलं. खाजगी रुग्णालयाने याबाबत चाचणी केली आहे. सरकारी रूग्णालयानं अद्याप याची टेस्ट केली नसल्याचं बंगळुरू आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. चीनमध्ये हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
चीनमध्ये HMPV व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने अन्य देशांसह भारतातही चिंता वाढली आहे. यादरम्यान दिल्ली आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत संपूर्ण तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत.
HMPV या नव्या व्हायरसची लक्षणंही जवळपास कोरोनासारखीच आहे. ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस हा श्वसनासंबंधित इतर कोणत्याही व्हायरसप्रमाणे आहे. या व्हायरसमध्ये सर्दी, खोकला सारखी सामान्य फ्लूची लक्षणं आढळतात.