Thursday, February 12, 2026
Homeक्राईमगावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

उस्मानिया पार्क परिसरात सापळा; कट्टा, तीन जिवंत काडतुसे व दुचाकी जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तुले बाळगणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेला यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरुद्ध कठोर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मोहम्मद साद अय्युब खान (वय २१, रा. शाहूनगर, जळगाव) हा मोटरसायकलवरून गावठी कट्टा घेऊन फिरत असून परिसरात दहशत निर्माण करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परिसरात सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याशिवाय संबंधित मोटरसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह फौजदार अतुल वंजारी, पोहेका विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, विलेश सोनवणे, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांचा सहभाग होता.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध शस्त्रधारकांविरुद्ध अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या