Thursday, March 5, 2026
Homeक्राईमलिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी अटकेत, चार लाखांची कार जप्त

जळगाव : प्रतिनिधी – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली सुमारे चार लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे.

दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजेच्या सुमारास सलमान खान अमानुल्ला खान (रा. निंभोरा, ता. रावेर) हे अजिंठा चौफुली परिसरात रावेरला जाण्यासाठी उभे होते. यावेळी कारमधून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना १०० रुपये भाड्यात रावेरला सोडण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले. काही अंतरावर गेल्यानंतर चालक व त्याच्या शेजारी बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या कमरेला चाकू लावून धमकावले, तर मागील सीटवर बसलेल्या दोघांनी त्यांचे हात पकडून खिशातील ९,७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

या घटनेप्रकरणी सलमान खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चार इसमांविरुद्ध गुन्हा क्रमांक १५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गोपनीय तपास करून गुन्ह्यात वापरलेली कार शोधून काढण्यात आली.

या कारवाईत शंभू उर्फ पप्पू सुभाष पाटील (रा. केदारनगर, पिंप्राळा, ता. जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच-४३-एबी-९२१०) जप्त करण्यात आली आहे.

तपासादरम्यान या गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे देखील निष्पन्न झाली असून ते सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील तसेच पोलीस कर्मचारी रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, प्रदीप चौरे आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

ताज्या बातम्या