धावत्या रेल्वेत प्रवाशाची बॅग लांबविणारा चोरटा जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव प्रतिनिधी धावत्या झेलम एक्सप्रेसमधून प्रवाशाची बॅग चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आनंद मोर्या (रा. अयोध्या) हे झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असताना जळगाव ते भुसावळ दरम्यान अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरी केली होती. या बॅगेत सुमारे १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने होते. या घटनेबाबत आनंद मोर्या यांनी इटारसी रेल्वे पोलिसांत शून्य क्रमांकाने तक्रार दाखल केली असून ती पुढील तपासासाठी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना खात्रीशीर माहिती मिळाली की हा गुन्हा जळगावमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (रा. फातेमा नगर, अल्फरा मशीदजवळ) व सोनू जयसिंग बागडे (रा. जाखनी नगर, कंजरवाडा) यांनी केला आहे. त्यानुसार पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे फातेमा नगर परिसरातून समीर शेख फिरोज उर्फ गोल्डन (वय २१) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांनी केली.
