धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना
पाळधी, ता. धरणगाव :- सळई भरलेल्या ट्रेलर ने तेलाच्या टँकरला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात टँकरच्या टाकी फुटून रस्त्यावर तेलच तेल सांडल्याची घटना शनिवारी रात्री सावदा फाट्याच्या वळण रस्त्यावर घडली. दरम्यान रस्त्यावर सांडलेले तेल गोळा करण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गुजरात राज्यातील गांधीधाम येथून ४० टन कच्चे सोयाबीन तेल भरलेला टैंकर (जीजे-१२, बीएक्स-५०१९) हा अमरावती येथे जात होता. हे टँकर पाळधी वळण रस्त्यावरील सावदा फाट्याजवळ आल्यानंतर त्याला रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने वाहन हळू केले. याचवेळी धुळे येथून सळई घेवून जाणारा ट्रेलर (एनएल-०१, एजे- ४८२८) ने या टँकरला समोरून जबर धडक दिली. यामुळे टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो महामार्गावर उलटला. याच वेळी तेलाची टाकी फुटून त्यातून तेल रस्त्यावर वाहू लागेले. ही धडक इतकी जबर होती की दोन्ही वाहने एकमेकांच्या कॅबिनमध्ये अडकून पडली होती. दरम्यान, अपघातानंतर जवळच असलेल्या नागरिकांनी तेल भरून नेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ही घटना शनिवारी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान घडली. ही घटना रस्त्याच्या एका बाजूला घडल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. या घटनेनंतर पाळधी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला.
याबाबत राजस्थामधील मागुडा येथील टँकर चालक रसूलखान साजनखान याने दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तर प्रदेशातील जिनिगा येथील ट्रेलर चालक विजय बळीराम चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पाळधी पोलीस करत आहेत.