Thursday, February 5, 2026
HomeBlogजळगाव मनपा निवडणुकीचा शंखनाद; आज पिंप्राळ्यातून रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा...

जळगाव मनपा निवडणुकीचा शंखनाद; आज पिंप्राळ्यातून रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

जळगाव मनपा निवडणुकीचा शंखनाद; आज पिंप्राळ्यातून रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, महायुतीने आपल्या विजयाचा संकल्प सोडला आहे. आज रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंप्राळा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेतून महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक मोहिमेचा अधिकृत शुभारंभ केला जाणार आहे.

प्रचाराचा हा श्रीगणेशा पिंप्राळा येथील भवानी मंदिर परिसरातून होणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रचंड जाहीर सभा पार पडेल. या ऐतिहासिक सभेत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील सर्व घटक पक्षांचे उमेदवार आणि पदाधिकारी आपली ताकद दाखवणार आहेत.

या जाहीर सभेसाठी महायुतीतील दिग्गज नेत्यांची मांदियाळी जळगावात जमणार आहे. यात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, गुलाबराव देवकर, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, किशोर अप्पा पाटील, अमोल दादा जावळे, चंद्रकांत पाटील आणि अमोल पाटील यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू  भंगाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच आरपीआय (आठवले गट) चे अनिल अडकमोल यांनी या सभेचे नियोजन केले आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि जळगावकर नागरिकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीचा विजय संकल्प दृढ करावा, असे आवाहन जिल्हा नेतृत्वातर्फे करण्यात आले आहे. या सभेमुळे शहराच्या राजकीय वातावरणात मोठी चुरस निर्माण झाली असून सर्वांचे लक्ष या तोफ डागण्याकडे लागले आहे.

ताज्या बातम्या