Friday, December 12, 2025
Homeखानदेशमहापालिका निवडणुका : मतदार यादी दुरुस्तीला मुदतवाढ

महापालिका निवडणुका : मतदार यादी दुरुस्तीला मुदतवाढ

महापालिका निवडणुका : मतदार यादी दुरुस्तीला मुदतवाढ

अंतिम यादी १५ डिसेंबरला; केंद्रनिहाय मतदार यादी २७ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या तयारीत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या मतदार यादी दुरुस्तीला राज्य निवडणूक आयोगाने आणखी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. प्रारूप याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला अधिक वेळाची आवश्यकता भासल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दुबार नावे, बोगस नोंदी तसेच स्पेलिंगमधील चुका मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याची माहिती आयोगाकडून देण्यात आली.

पूर्वी जारी केलेल्या २६ नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होणार होती. मात्र दुरुस्तीचे काम अपेक्षेपेक्षा वाढल्याने आता ही अंतिम यादी १५ डिसेंबर रोजी अधिप्रमाणित करून जाहीर केली जाणार आहे.
मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी १५ ऐवजी २० डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल, तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २२ ऐवजी २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित होणार आहे.

दुरुस्तीचे काम सुरूच
राज्य निवडणूक आयुक्तांनी मागील आठवड्यात सर्व महापालिकांच्या आयुक्तांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत अनेक महापालिकांमध्ये ५ ते १५ टक्क्यांपर्यंत नावे चुकीची, दुबार किंवा संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. स्पेलिंग, पत्ता, नावांचा क्रम, प्रभागांतील त्रुटी अशा अनेक मुद्द्यांवर पुन्हा तपासणीची गरज निर्माण झाली. त्यामुळे अतिरिक्त कालावधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

निवडणूक वेळेवरच
मतदार यादी दुरुस्तीला मुदतवाढ मिळाल्यानंतरही महापालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच — म्हणजेच १५ जानेवारीच्या आसपास — होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदार यादीची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिलेला हा अवधी निवडणूक प्रक्रियेला विलंब न लावता प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठीच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या