Saturday, October 4, 2025
Homeक्राईमभीषण अपघात ; पुरनाड फाट्यावर डंपरखाली तिघांचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाने डंपर...

भीषण अपघात ; पुरनाड फाट्यावर डंपरखाली तिघांचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाने डंपर पेटवला

भीषण अपघात ; पुरनाड फाट्यावर डंपरखाली तिघांचा जागीच मृत्यू; संतप्त जमावाने डंपर पेटवला

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) │ मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपर पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बी. एन. अग्रवाल कंपनीकडून इंदूर–हैदराबाद महामार्गाचे काम सुरू असून, या कंपनीचा वाळूने भरलेला डंपर (क्र. एमएच-१९ सीएक्स-२०३८) दुचाकीला धडकला. धडकेनंतर दुचाकी जवळपास ५०-६० फूट फरफटत गेली. या दुर्घटनेत नितेश जगतसिंग चव्हाण (३२), सुनिता नितेश चव्हाण (२५) आणि त्यांचा मुलगा शिव (७, सर्व रा. मातापूर, ता. डोईफोडा, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नेहालसिंग नितेश चव्हाण (११) हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

चव्हाण कुटुंब हे कामानिमित्त जळगाव येथे वास्तव्यास होते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने इच्छापुर देवीचे दर्शन घेण्यासाठी ते दुचाकीने जात असताना पुरनाड फाट्यावर हा अपघात झाला.

अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले. बी. एन. अग्रवाल कंपनीचे चालक मद्यपान करून वारंवार वाहने चालवतात, असा आरोप करत संतप्त जमावाने डंपरची तोडफोड करून पेटवून दिले. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला नियंत्रित केले.

तिन्ही मृतदेहांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आले असून, पोलिसांकडून उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या