रेल्वेखाली मायलेकींची आत्महत्या : नशिराबाद येथील दुर्दैवी घटना
जळगाव : कौटुंबिक आयुष्याच्या वादाला कंटाळून एका विवाहितेने आपल्या सहा वर्षीय चिमुकलीसह धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २२) सायंकाळी भादली रेल्वे पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ होत आहे.
मृतांमध्ये मनीषा सुरेश कावळे (वय २८) आणि त्यांची मुलगी गौरी (वय ६) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दोन्हींच्या मृतदेहांचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी हलवले. या घटनेची नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भवानीनगर, नशिराबाद येथे मनीषा आपल्या पती सुरेश आणि दोन मुलींनिशी राहत होत्या. पती सुरेश हे एमआयडीसीतील चटई कंपनीत नोकरीला आहेत. सोमवारी दुपारी मनीषा यांनी “गावातील महिलेकडून तांदूळ आणते” असे सांगून लहान मुलगी गौरीला सोबत घेतले आणि घराबाहेर पडल्या. मात्र त्या परतच आल्या नाहीत.
सायंकाळपर्यंत पत्नी व मुलगी परत न आल्याने पती सुरेश यांनी शोधाशोध सुरू केली. त्याच दरम्यान भादली पुलाजवळ महिला व लहान मुलगी रेल्वेखाली आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सुरुवातीला मृतदेह अनोळखी म्हणून नोंदवला गेला. मात्र नंतर सुरेश कावळे यांनी मृतदेहांची ओळख पटवली .
एकाचवेळी मायलेकींचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेकॉ कमलाकर बागूल करीत आहेत.