त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला; तिघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर येथे साधू-महंतांच्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांवर पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची गंभीर घटना शनिवारी घडली. या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजणे वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेले असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंगच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले. ओळख सांगूनही पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देत मारहाण करण्यात आली. घटनेचा मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढती चिंता
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होत असून, त्याआधी विकासकामांच्या पार्श्वभूमीवर वारंवार पत्रकार येथे जात असतात. त्यामुळे घडलेली ही घटना गंभीर मानली जात आहे. पार्किंगचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध असल्याचे समजते. याबाबत चौकशी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
कडक कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
तिघांना अटक
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या ऋषिकेश योगेश गांगुर्डे, प्रशांत राजू सोनवणे व सौरभ राजेंद्र खाटीकडे या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्यानंतर संशयितांच्या समर्थकांनी पोलिस ठाण्यात जमाव जमवून प्रकरण वेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याने तेथील वातावरण नियंत्रणात आले.
या घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत असून, पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.