मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
२३ सप्टेंबर रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात होणार पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली प्रतिनिधी : मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांना २०२३ सालचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने शनिवारी सोशल मीडियावर ही घोषणा केली. येत्या २३ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
मोहनलाल यांनी १९७८ मध्ये थिरानोटम या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि आजवर ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाबरोबरच निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला आहे.
त्यांच्या कारकिर्दीतील कामगिरीबद्दल त्यांना पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये दोन सर्वोत्कृष्ट अभिनेता, दोन विशेष ज्युरी व निर्माता म्हणून सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार समाविष्ट आहे. तसेच नऊ केरळ राज्य पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. भारत सरकारकडून २००१ मध्ये पद्मश्री तर २०१९ मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
दरम्यान, या पुरस्कारासोबत स्वर्णकमळ पदक, शाल व दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.