“सर नका जाऊ हो”… डोंगर कठोराच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा आक्रोश, निरोप समारंभ भावनांनी ओथंबला
आठ वर्षांच्या सेवेनंतर शेखर तडवी यांची बदली
यावल I मिलिंद तायडे I
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत आठ वर्षे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेखर बशारत तडवी यांची अंधारमळी (ता. रावेर) येथे बदली झाली आहे. या निमित्ताने बुधवारी (दि. १७ सप्टेंबर) शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.
निरोपाच्या क्षणी विद्यार्थ्यांचा टाहो
निरोप कार्यक्रमात शाळा परिसर भावनिक वातावरणाने भारून गेला. तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी टाहो फोडत “सर नका जाऊ हो” अशी आर्त हाक दिली. काही लहान मुले-मुली रडतच घरापर्यंत गेली. शिक्षकांविषयीची त्यांची नाळ किती घट्ट होती याचे दर्शन यावेळी घडले.
शाल-श्रीफळ देऊन गौरव
समारंभात मुख्याध्यापिका विजया पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान तडवी, शिक्षण तज्ञ अनिल पाटील, दिलीप तायडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शेखर तडवी यांचा गौरव करण्यात आला.
सेवाकालातील आठवणींना उजाळा
मनोगत व्यक्त करताना उपशिक्षक तडवी यांनी आपल्या सेवाकालातील अनुभव, अडीअडचणी, विद्यार्थ्यांसोबतची जुळलेली नाळ यांचा भावपूर्ण उल्लेख केला. “शिक्षकाचे खरे यश म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करणे” असे सांगून त्यांनी सहकाऱ्यांचे व शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्यही मान्यवरांसमोर मांडले.
गावभर चर्चा
भावनिक वातावरणात झालेल्या या निरोप समारंभाची चर्चा गावभर सुरू झाली आहे. शाळेतच नव्हे तर गावकऱ्यांच्या मनातही “शिक्षक-विद्यार्थी यांचे नाते किती दृढ असते” याचे उदाहरण या प्रसंगातून समोर आले.
निरोप समारंभ प्रसंगी मुख्याध्यापिका विजया पाटील,ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शिक्षण तज्ञ अनिल पाटील,शिक्षिका ज्योती भादले,मोहिनी पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमजान तडवी,उपाध्यक्षा आसमा तडवी,सदस्य शरीफा तडवी,संजय बऱ्हाटे,कल्पना धनगर,संजय आढाळे,दादाराव पांडव यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.