Saturday, October 4, 2025
Homeशैक्षणिकविद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे ही काळाची गरज...

विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे ही काळाची गरज -कुलगुरू

विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे ही काळाची गरज -कुलगुरू

केसीई सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

जळगाव : खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने गेल्या आठ दशकांत खान्देशातील सर्वसामान्य पिढीला शिक्षित, सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याचे कार्य केले असून, ८१ वर्षांच्या प्रवासात शैक्षणिक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. संस्थेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त मनभावन संकुलातील कान्ह कला मंदिर येथे भव्य सोहळा पार पडला.

या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी भूषविले.

कार्यक्रमाला सचिव अॅड. प्रमोद पाटील, सहसचिव अॅड. प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी.टी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिल्पा बेंडाळे, प्राचार्य अशोक राणे, डॉ. हर्षवर्धन जावळे, भालचंद्र पाटील, संजय प्रभुदेसाई, शैक्षणिक संचालक प्रा. मृणालिनी फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते.

सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात प्रा. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) नुसार केसीई सोसायटी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विज्ञान, कला, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS), भारतीय संगीत, रिफ्लेक्सोलॉजी, निसर्गोपचार आणि योग विज्ञान या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहे.

अध्यक्षीय भाषणात अॅड. प्रकाश पाटील यांनी स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत मागील पाच वर्षांत आयएमआर, इंजिनिअरिंग, मुलांचे वसतिगृह, लॉ कॉलेज आणि ५०० आसन क्षमतेचे नाट्यगृह अशा सुविधा वाढविल्याचे सांगितले.

या कार्यक्रमात संस्थेचा गौरवशाली इतिहास आणि वाटचाल दर्शवणारी चित्रफीत दाखवण्यात आली. कान्ह ललित केंद्राने सप्तकलांचा विविध अविष्कार सादर केला. सोहम योगा सेंटर, एकलव्य क्रीडा संकुल, एस.एस. मणियार लॉ कॉलेज, किलबिल बालक मंदिर, जी.पी.वी.पी. शाळा, ए.टी. झांबरे माध्यमिक शाळा, ओरीओन सीबीएसई व स्टेट इंग्लिश मिडीयम स्कूल्स, एम.जे. कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, आयएमआर, स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज, कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन, अध्यापक कॉलेज आणि ओजस्विनी कला महाविद्यालय यांनी आपापल्या ज्ञानशाखांचे सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री भलवतकर आणि मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले. आभारप्रदर्शन सचिव अॅड. प्रमोद पाटील यांनी केले.

ताज्या बातम्या