पाळधी तरसोद बायपास महामार्गावर दोन ट्रकांची समोरासमोर धडक ; दोन जण जागीच ठार
कचरा फॅक्टरी जवळील घटना
जळगाव : पाळधी-तरसोद बायपास महामार्गाचे उद्घाटन होण्याआधीच भीषण अपघात झाला. बुधवारी (२७ ऑगस्ट) संध्याकाळी पाच वाजता कचरा फॅक्टरीसमोर दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत दोन चालकांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.धडक एवढी भीषण होती की दोन्ही ट्रकांच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला.
गुजरातमधील मोरबी येथून टाईल्स घेऊन आंध्र प्रदेशातील खाकीनाडा येथे जाणारा ट्रक (क्र. एपी ३९ युएफ ३५९९) बायपासवरून जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने (क्र. जीजे १६ एवाय ००७८) ओव्हरटेकच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. धडकेत टाईल्स ट्रकचा चालक एस. के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) जागीच ठार झाला. दुसऱ्या ट्रकचा चालकही मृत्यूमुखी पडला. तर मौलालीचा क्लिनर एस. के. जानी याने वेळेत उडी घेतल्याने तो बचावला.
कोळशाच्या ढिगाऱ्यात अडकलेले बचावले
धडकेनंतर कोळशाने भरलेला ट्रक समोरील ट्रकवर जाऊन अडकला. केबिनचा चुराडा झाल्याने चालक व क्लिनर अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागले. जेसीबीच्या सहाय्याने ट्रकमधील कोळसा उपसून, ट्रक मागे ओढल्यानंतरच बचावकार्य शक्य झाले.
बायपासचे उद्घाटन बाकी, तरी सुरू वाहतूक
या बायपासचे औपचारिक उद्घाटन अद्याप झालेले नाही. मात्र चाचणी म्हणून एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूंनी वाहने ये-जा करत असताना हा अपघात झाला. घटनेनंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले व वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली.