Saturday, August 2, 2025
HomeBlogअकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाविरोधात पालकांनी शाळेला लावले 'कुलूप'

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाविरोधात पालकांनी शाळेला लावले ‘कुलूप’

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाविरोधात पालकांनी शाळेला लावले ‘कुलूप’
मोठे वाघोदे प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या २०२५-२६ पासून सुरू झालेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. विशेषतः मोठे वाघोदे येथील मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवणे शक्य नसल्याने, ज्यांच्यासाठी शाळेत विज्ञान शाखा सुरू करण्यात आली होती, त्याच मुली आता मेरीट लिस्टमुळे प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या अन्यायाविरोधात संतप्त पालकांनी थेट शाळेच्या वर्गाला कुलूप लावून आपला निषेध व्यक्त केला.

ऑनलाइन प्रवेश फेरी सुरू झाली असली तरी, आपल्या मुला-मुलींना प्रवेश मिळणार नाही की काय या भीतीने गावातील आई-वडील हवालदिल झाले आहेत. त्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संचालक मंडळाकडे आपली गाऱ्हाणी मांडली. अनेक पालक मोलमजुरी करून गुजराण करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी लांब पाठवू शकत नाहीत. त्यांची मुले पाचवीपासून याच विद्यालयात शिकत असल्याने, त्यांना येथेच अकरावीत प्रवेश मिळावा अशी त्यांची आग्रही मागणी होती.

‘प्रवेश द्या, नाहीतर वर्ग उघडू देणार नाही!’
“आमच्या पाल्यांना अकरावीत प्रवेश द्या, अन्यथा आम्ही अकरावीचा वर्ग उघडू देणार नाही,” असे बजावत पालकांनी थेट वर्गाला कुलूप ठोकले आणि आपला संताप व्यक्त केला. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेवर पालक आणि शिक्षकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.

संस्थेच्या वतीने कुलदीप पाटील आणि पी. एल. महाजन यांनी विद्यालयात येऊन पालकांची समजूत काढली. सचिव किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्याशी या संदर्भात बोलणे झाल्याचे सांगितले. तसेच, विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि करू, असे आश्वासन पालकांना दिले.

महिलांसह पालकांनी स्वतः आमदारांना भेटून आपली तक्रार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांनीही पालकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

 

ताज्या बातम्या