Wednesday, July 30, 2025
HomeBlogजळगाव हादरले! अल्पवयीन मुलीची विक्री, बळजबरीने लग्न, गर्भपात झाल्याच्या नैराश्यातून पित्याने उचलला...

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीची विक्री, बळजबरीने लग्न, गर्भपात झाल्याच्या नैराश्यातून पित्याने उचलला टोकाचा निर्णय ! 

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीची विक्री, बळजबरीने लग्न, गर्भपात झाल्याच्या नैराश्यातून पित्याने उचलला टोकाचा निर्णय ! 

 पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ; सीबीआय चौकशीची मागणी

जळगाव, २९ जून २०२५ — हरीविठ्ठल नगरातील एका अल्पवयीन मुलीच्या विक्री लग्न आणि गर्भपात प्रकरणाने संपूर्ण जळगाव हादरले आहे. या संतापजनक घटनेमुळे मानसिक तणावात आलेल्या पीडितेच्या वडिलांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.

रोजगाराचं आमिष आणि विक्री

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक महिलांनी रोजगाराच्या नावाखाली पीडित अल्पवयीन मुलीला नाशिक येथे नेले. तिथून तब्बल अडीच लाख रुपये व दागिन्यांच्या मोबदल्यात तिची कोल्हापूर येथील एका टोळीला विक्री करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लग्न लावण्यात आले. काही महिन्यांनी ती गर्भवती राहिली आणि नंतर तिचा गर्भपात करण्यात आला, असा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे.

घरी परत आल्यावर उलगडली काळीज पिळवटणारी कहाणी

या अमानुष वागणुकीला कंटाळून मुलगी पळून आपल्या घरी परतली आणि सर्व घडलेला प्रकार तिने आईवडिलांना सांगितला. ही माहिती समजताच कुटुंबीयांनी रामानंदनगर पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

धमक्या आणि आत्महत्येची परिणीती

दरम्यान, पीडित मुलीला विकत घेणाऱ्या कोल्हापूर येथील ८ ते १० आरोपींनी कुटुंबीयांना फोनवरून “मुलगी परत पाठवा किंवा पैसे द्या” अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या. पोलीस प्रशासनाकडून मिळणारे दुर्लक्ष आणि सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे तणावग्रस्त वडिलांनी आत्महत्या केली, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

मृतदेह ताब्यात नकार, सीबीआय चौकशीची मागणी

या दु:खद घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. “जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही आणि ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही,” असा ठाम निर्णय त्यांनी घेतला आहे.

त्याचबरोबर, रोजगाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलींची विक्री करणारे संगठित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या