‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; बॉलिवूडसह चाहत्यांत शोककळा
मुंबई – ‘कांटा लगा’ या सुपरहिट रिमिक्स गाण्याने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेफालीला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर तिला तातडीने अंधेरीतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करताच मृत घोषित केले.
शेफालीच्या निधनाची बातमी सर्वप्रथम पत्रकार विकी लालवानी यांनी शेअर केली. त्यानंतर राजीव अडातिया, अली गोनी आणि गायक मिका सिंग यांनीही सोशल मीडियावरून या बातमीला दुजोरा दिला. तिचा पती अभिनेता पराग त्यागी रुग्णालयाबाहेर दु:खी अवस्थेत दिसून आला, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेफालीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तिच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून, अनेक चाहते सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या आठवणी शेअर करत आहेत.
“विश्वास बसत नाही की तू इतक्या लवकर गेलीस…” अशा भावना व्यक्त करत अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शेफाली जरीवाला ही केवळ ‘कांटा लगा’ गर्ल नव्हती, तर ‘बिग बॉस’ सारख्या रिअॅलिटी शोमधूनही तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. तिचं निधन हे केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण चाहतावर्गासाठी मोठा धक्का ठरला आहे.