५०० रुपयांत सिलिंडर, मोफत रेशन, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज
काँग्रेसकडून दिल्लीकरांवर आश्वासनांचा पाऊस
नवी दिल्ली: दिल्लीत सत्ता आली तर ५०० रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर, मोफत रेशन आणि ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. अरविंद केजरीवाल तीनदा मुख्यमंत्री झाले आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तरी दिल्लीकरांच्या समस्या सुटल्या नाहीत, उलट परिस्थिती अधिक बिघडली आहे, असा दावाही काँग्रेसने केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत तीन नवी आश्वासने दिली. काँग्रेसची दिल्लीत सत्ता आली तर आम्ही पाच गॅरंटी पूर्ण करू, असे रेड्डी म्हणाले. काँग्रेसने यापूर्वी सर्वप्रथम प्यारी दीदी योजनेची घोषणा केली होती.
त्यानुसार प्रत्येक महिलेला दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. यानंतर काँग्रेसने २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार असलेल्या जीवन रक्षा आरोग्य विमा योजनेची घोषणा केली. काँग्रेसने सुशिक्षित बेरोजगारांना एक वर्ष दरमहा ८,५०० रुपये देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. यामध्ये आता ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर, मोफत रेशन किट आणि ३०० युनिटपर्यंत मोफत वीज या आश्वासनांची भर पडली आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंदर यादव यांनी ५०० रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर योजनेचा १७ लाख कुटुंबांना फायदा होणार असल्याचा दावा केला. दरमहा मोफत रेशन किटमध्ये ५ किलो
तांदूळ, २ किलो साखर, एक लिटर तेल, ६ किलो डाळी आणि २५० चहापावडर असेल, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही तेलंगणात ज्याप्रमाणे दिलेली आश्वासने पूर्ण केली त्याचप्रमाणे दिल्लीत देखील पूर्ण करू, याबाबतचा आदेश मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काढण्यात येईल, असे यादव म्हणाले. यावेळी रेड्डी यांनी दिल्लीला मेट्रो रेल्वे दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात मिळाल्याचा आणि दिल्ली मेट्रो देशासाठी आदर्श ठरल्याचा दावा केला. सीएनजीवरील वाहनांना चालना देणे आणि राज्यात ठिकठिकाणी फ्लायओव्हर बांधणे हे देखील दीक्षित सरकारमुळेच शक्य झाल्याचे ते म्हणाले.