शस्त्रसंधीच्या घोषणेनंतरही इस्त्रायलचे गाझावर हल्ले ; हल्ल्यात ७२ ठार
तेल अविव
इस्त्रायल व पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा मध्यस्थ देशांनी केली असली तरी इस्त्रायलकडून गाझा पट्टीत व्यापक हल्ले सुरूच आहेत. इस्त्रायलने गुरुवारी रात्रभर केलेल्या ताज्या हल्ल्यात जवळपास ७२ पॅलेस्टिनी ठार झाले तर २०० हून अधिक जण जखमी झाले. शस्त्रसंधी करारातील काही अटी मान्य करण्यास हमासने अखेरच्या क्षणी नकार दिल्याने आम्ही शस्त्रसंधीवर शिक्कामोर्तब केले नसल्याचे इस्त्रायलच्या पंतप्रधानांचे म्हणणे आहे.
इस्त्रायल आणि हमासदरम्यान शस्त्रसंधी व्हावी यासाठी अमेरिका, इजिप्त आणि कतारकडून सुरुवातीपासून मध्यस्थी केली जात आहे. त्यानुसार या देशांनी दोन्ही गटांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केल्यानंतर गाझा पट्टीतील लोकांनी जल्लोष केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. संयुक्त राष्ट्र तसेच भारतासह अनेक देशांनी या शस्त्रसंधीचे स्वागत केले. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात तर शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याची चढाओढ लागली. परंतु, एकीकडे शस्त्रसंधी लागू झाल्याचे जगजाहीर झालेले असताना दुसरीकडे इस्त्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरूच ठेवल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. ताज्या
हल्ल्यामुळे गाझातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरणदेखील कायम असल्याचे स्थानिक प्रशासनाने म्हटले. हमासने अखेरच्या क्षणी शस्त्रसंधी करारातील काही अटी मान्य करण्यास नकार दिल्याने हा करार अधांतरी लटकल्याचा दावा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला. हमास जोपर्यंत आपली आडमुठी भूमिका सोडत नाही, तोपर्यंत आम्ही शस्त्रसंधीच्या करारावर शिक्कामोर्तब करणार नाही, असे नेतन्याहूंनी स्पष्ट केले.