Saturday, October 4, 2025
Homeखानदेशवाढदिवसाच्या पार्टीसाठी निघालेल्या इको वाहनाचा भीषण अपघात

वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघालेल्या इको वाहनाचा भीषण अपघात

वाढदिवसाच्या पार्टीसाठी निघालेल्या इको वाहनाचा भीषण अपघात

पती-पत्नींसह पाच जणांचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी

जळगाव/मलकापूर (विशेष प्रतिनिधी) : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी भुसावळ शहरातून निघालेल्या इको वाहनाचा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर-मलकापूरदरम्यान बुधवारी (दि. १७ सप्टेंबर) रात्री ११.१५ वाजता झाला. भरधाव इको कारने ट्रक ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने भुसावळ व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात इको कार चालक साजिद अजीज बागवान (वय ३०, रा. भुसावळ), त्याची पत्नी तानी बागवान (वय २५), जुमा शिकडर (वय ४९) तसेच एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर संतोष तेजराव महाले (वय ४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) यांचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जखमींमध्ये पंकज दिलीप गोपाळ (वय २२, रा. नांद्रा हवेली, जि. जळगाव), दीपीका विश्वास (वय ३०, रा. पश्चिम बंगाल), टीना अजय पाटील (वय ४५, रा. भुसावळ) यांच्यासह एक अनोळखी महिला यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने जळगावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साजिद बागवानचा वाढदिवस असल्याने कुटुंबीय व मित्र मंडळी एकूण नऊ जण इको कार (क्रमांक एमएच ४६ एक्स ३१२०) मधून मलकापूरकडे निघाले होते. मात्र भरधाव वेगामुळे वाहनावरील ताबा सुटून ट्रक ट्रेलरला धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघाताची माहिती मिळताच मलकापूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि हेमराज कोळी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी अक्षय भास्कर सोनवणे (वय २२, रा. चिखली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला. प्राथमिक तपासात चालक साजिद बागवान याने बेदरकारपणे वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१), १२५(बी) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वाढदिवशीच साजिदचा मृत्यू झाल्याने भुसावळ शहरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास सपोनि हेमराज कोळी करीत आहेत.

ताज्या बातम्या