लोकसहभागातून ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ यशस्वी करूया’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव: लोकसहभागातून ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ यशस्वी करूया, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेत आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि सर्व अधिकाऱ्यांनी हे अभियान स्वतःचे समजून काम करण्याचे आवाहन केले.
सरपंचांनी विरोधकांना सोबत घेऊन काम करावे
पालकमंत्री पाटील म्हणाले, “ग्रामसभा ही गावातील खरी संसद असून, ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे. सरपंच हा त्या गावाचा मुख्यमंत्री असतो.” त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना गाव विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला. “राजकारणातील वैरभाव कमी करून विरोधकांना सोबत घेऊन काम करणारा सरपंचच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या अभियानात सामाजिक मंडळे आणि महिला बचत गटांना सहभागी करून घेतल्यास प्रत्येक गाव समृद्ध होईल, असे ते म्हणाले.
ISO मानांकन मिळालेल्या ग्रामपंचायतींचा गौरव
या कार्यक्रमात जिल्ह्यातील ISO मानांकन प्राप्त केलेल्या ५६ ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते नेरी (ता. जामनेर), पाळधी आणि मुसळी (ता. धरणगाव) या ग्रामपंचायतींचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. तसेच, ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा गौरव
मुख्यमंत्री १५० दिवस सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून गौरविण्यात आले. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायतींनी पारदर्शक कारभारावर भर देण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी ‘माझा गाव, माझा विकास’ या भावनेने काम करण्याचे महत्त्व सांगितले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे, मनपा आयुक्त श्री. ढेरे, तसेच अनेक सरपंच, ग्रामसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब अकलाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन आर. एस. लोखंडे यांनी केले.