Saturday, October 4, 2025
Homeजळगाव जिल्हामुंबईत रेड अलर्ट; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत रेड अलर्ट; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत रेड अलर्ट; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा
धरणांतून विसर्ग वाढला, नद्यांना पूर; प्रशासन सतर्कतेवर

मुंबई | महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर धरला असून हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि जालना जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे सकाळीही काळोखाचे वातावरण होते. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

पुण्यात येलो तर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आला आहे. नदी पात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीत महापालिकेची यंत्रणा रात्रभर ‘ऑन अलर्ट’ मोडवर राहिली. पावसाचा धोका आणि भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता NDRF पथके तैनात आहेत. सीसीटीव्हीद्वारे सतत नजर ठेवली जात असून नागरिकांना ‘सुरक्षित रहा, गरज असेल तरच बाहेर पडा’ असे आवाहन करण्यात आलंय.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका अतिमुसळधार पावसाने झोडपला आहे. पाटणादेवी परिसरात डोंगरी नदीला महापूर आला असून चंडिका देवी मंदिर तात्पुरते बंद करण्यात आलं आहे. डोंगरी व तितुर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने काठावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर आला असून शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यातील लघु-मध्यम प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.

दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट-वागदरी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत नदी-नाले धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून बचावकार्य दल सज्ज ठेवण्यात आले आहे. 🌧️

ताज्या बातम्या