मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मनसे-उद्धवसेनेचा एकत्रित मोर्चा
काँग्रेस आणि शरद पवार गटही सहभागी
मुंबई – मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्रितपणे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गे काढण्यात येणार असून, काँग्रेस व शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्तेही त्यात सहभागी होणार आहेत.
यापूर्वी राज ठाकरे यांनी ५ जुलै तर उद्धव ठाकरे यांनी ७ जुलै रोजी स्वतंत्र मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हा मोर्चा एकत्र काढण्याचा निर्णय झाला. या एकत्रित आंदोलनाची माहिती उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
“मराठी माणसासाठी दोन स्वतंत्र मोर्चे काढण्यापेक्षा एकत्र आले तर प्रभाव अधिक वाढेल,” अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती, असे राऊत म्हणाले.
मोर्चाच्या तारखेसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी ६ जुलैला आषाढी एकादशी असल्याने ५ किंवा ७ जुलैपैकी एक तारखाच निवडावी, अशी सूचना केली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ५ जुलै ही अंतिम तारीख निश्चित केली.
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, “हिंदी सक्तीविरोधातील हा एकत्रित मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरेल.”
दरम्यान, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, “तिसऱ्या भाषेच्या अभ्यासक्रमात केवळ तोंडओळख असेल; वाचन आणि लेखनाचा ताण विद्यार्थ्यांवर टाकला जाणार नाही.”
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रहितासाठी आम्ही नेहमी पुढे उभे राहतो.”
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. “मराठीच्या मुद्द्यावर सर्व पक्ष, संस्था, साहित्यिक आणि मराठीप्रेमी यांनी एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले.