Saturday, October 4, 2025
Homeक्राईमबनावट कॉल सेंटरची तीन राज्यात व्याप्ती !

बनावट कॉल सेंटरची तीन राज्यात व्याप्ती !

बनावट कॉल सेंटरची तीन राज्यात व्याप्ती !

क्रिप्टोकरन्सीद्वारे हवालामार्गे भारतात येत होता पैसा; माजी महापौर ललित कोल्हेसह आठ जणांना पोलीस कोठडी

जळगाव : शिवसेनेचे पदाधिकारी व माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा जळगाव पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. या सिंडीकेटची व्याप्ती महाराष्ट्रासह राजस्थान व पश्चिम बंगालपर्यंत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी ललित कोल्हेसह आठ जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून या ठिकाणाहून ३१ लॅपटॉप, ७ मोबाईल, इंटरनेट सुविधा व कॉल सेंटरसाठी लागणारे साहित्य जप्त केले. अॅमेझॉनसह इतर बँक व कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी राकेश आगारिया, ललित कोल्हे, नरेंद्र आगारिया, आदिल सैय्यद निशार अहमद, इम्रान अकबर खान, मोहम्मद जिशान नूरी, शाहबाज आलम, साकीब आलम व मोहम्मद हाशिर अशा आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायदा, माहिती तंत्रज्ञान अधिनियम व दूरसंचार अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी महापौरांवर आधीच १९ गंभीर गुन्हे

तपास अधिकारी डॉ. नितीन गणापुरे यांनी न्यायालयात सांगितले की, माजी महापौर कोल्हे यांच्यावर यापूर्वीच १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यांच्या वकिलांनी हे सर्व गुन्हे राजकीय हेतूने लावलेले असल्याचे प्रतिपादन केले.

हॉटेलमध्ये राहण्याची सोय कोल्हेंनीच केली

मुख्य सूत्रधार आदिल सैय्यद व अकबर हे जळगावात आल्यानंतर शहरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये थांबले होते. त्यांचे रुम बुकिंग व पैसे स्वतः ललित कोल्हे यांनी दिल्याचे तपासातून समोर आले आहे.

फसवणुकीचा पैसा क्रिप्टोद्वारे भारतात

फसवणुकीतून मिळालेला परकीय चलनातील पैसा आरोपी क्रिप्टोकरन्सी खरेदीसाठी वापरत होते. त्यानंतर मुंबईतील एजंटमार्फत हवालामार्गे भारतात पैसा आणून तो भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केला जात होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्ह्यांच्या दिशेने गेला आहे.

बनावट कागदपत्रांवर सीमकार्ड

घटनास्थळावरून मिळालेल्या मोबाईलमध्ये वापरलेले सीमकार्ड हे बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच जप्त लॅपटॉपमधील डेटा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या