बँक मॅनेजरची आत्महत्या: मुलाच्या आठवणीत घेतला टोकाचा निर्णय
जुनागढ वृत्तसंस्था: जुनागढ येथील सहकारी आणि ग्रामीण कृषी बँकेचे व्यवस्थापक कनुभाई (वय ५२) यांनी गेस्ट हाऊसमधील खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
कनुभाई यांच्या खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली असून, त्यात त्यांनी पत्नी आणि मुलाच्या नावाने शेवटचा संदेश लिहिला आहे. त्यांनी पत्रात नमूद केले की, “मला रुद्रची खूप आठवण येते आणि त्याच्याशिवाय जगणे अशक्य आहे, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे. तुम्ही दोघांनी शांततेत जगावे आणि कशाचीही चिंता करू नये.”
मुलाच्या निधनानंतर तणावाखाली होते कनुभाई
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, कनुभाई गेल्या २० वर्षांपासून बँकिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या विविध शाखांमध्ये बदली झाल्यानंतर सध्या ते जुनागढ येथे कार्यरत होते व बँकेच्या गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास होते.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दीड वर्षांपूर्वी कनुभाई यांचा धाकटा मुलगा रुद्र यानेही आत्महत्या केली होती. त्या घटनेनंतर कनुभाई सातत्याने तणावात राहत होते. मुलाच्या मृत्यूचा धक्का त्यांना पचवता आला नाही आणि अखेर त्यांनीही त्याच मार्गाचा अवलंब केला
या घटनेमुळे कनुभाई यांच्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.