चाळीसगाव : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे पुणे ते अमरावती अशी साप्ताहिक विशेष एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात आली असून या गाडीला चाळीसगाव स्थानकावर थांबा मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. पुणे ते अमरावती विशेष गाडी क्रमांक ०१४०३ ही सात ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी पुणे येथून सायंकाळी सात पंचावन्न वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी दहा पाच वाजता अमरावतीला पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१४०४ अमरावती ते पुणे ही आठ ऑक्टोबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी दुपारी बारा वाजता अमरावतीहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री बारा पंधरा वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीला दौड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा या स्थानकांवर थांबे असतील. गाडीमध्ये चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी, दोन सामान्य आसन व्यवस्था तसेच गार्ड ब्रेक व्हॅन असे डबे असतील. दरम्यान गाडी क्रमांक ०१४०३ पुणे ते अमरावती विशेष एक्सप्रेस सकाळी चार अठ्ठावीस वाजता चाळीसगाव येथे येईल तर गाडी क्रमांक ०१४०४ अमरावती ते पुणे विशेष एक्सप्रेस सायंकाळी पाच तेरा वाजता चाळीसगावला येऊन पुण्याकडे प्रस्थान करेल. या गाडीमुळे दिवाळीच्या काळात पुणे ते अमरावती दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, नोकरीधारक व व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. चाळीसगावकरांची ही जुनी मागणी खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली आहे.