डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ उद्या घेणार
वॉशिंग्टन वृत्तसंस्था
रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प सोमवार, २० जानेवारी रोजी संसदेत अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. अमेरिकेतील हिमवादळामुळे ४० वर्षांत प्रथमच शपथविधीचे आयोजन मोकळ्या जागेत न करता संसदेत करण्यात आले आहे. शपथ घेताना ट्रम्प आपल्या आईने दिलेले बायबल आणि लिंकन बायबलचा उपयोग करतील. शपथविधी सोहळ्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशिवाय विविध देशांचे नेते व अमेरिकेतील अनेक उद्योगपती सहभागी होतील.
डेमोक्रॅटिकचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा पराभव करून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प सोमवारपासून देशाची सूत्रे आपल्या हाती घेतील. पण हिमवादळामुळे ४० वर्षांत पहिल्यांदा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी सोहळा संसदेमध्ये आयोजित केला जात आहे. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तापमान उणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी स्वतः शुक्रवारी सर्वांच्या सुरक्षेमुळे आपण संसदेत शपथ घेणार असल्याची माहिती दिली होती. देशात सध्या हिमवादळ सुरू असून, कोणालाही इजा व्हावी, अशी आपली इच्छा नाही. त्यामुळे मी प्रार्थना, इतर भाषणाशिवाय उद्घाटनाचे भाषणदेखील संसदेतून देणार आहे. सर्वजण सुरक्षित आणि आनंदी राहतील तर आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू, असे ट्रम्प म्हणाले. यापूर्वी १९८५ साली रोनाल्ड रिगन यांचा दुसऱ्या कार्यकाळातील शपथ सोहळा संसदेत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तापमान उणे २३ ते २९ अंश सेल्सिअसदरम्यान होते