Saturday, October 4, 2025
HomeBlogजळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: मोबाईल चोरीचा पर्दाफाश, चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त

जळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: मोबाईल चोरीचा पर्दाफाश, चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त

जळगावात एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: मोबाईल चोरीचा पर्दाफाश, चारचाकी वाहनासह मुद्देमाल जप्त

दोन संशयित अटकेत, ५.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तपास सुरू

जळगाव, १ सप्टेंबर २०२५: जळगावातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत दोन संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल, २२,५०० रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे मारुती अर्टीगा चारचाकी वाहन जप्त केले आहे. ही घटना २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास अजिंठा चौकाजवळ घडली होती.

फिर्यादी अजिंठा चौकात बसची वाट पाहत असताना एका चारचाकी वाहनातील अज्ञात व्यक्तींनी त्यांना धुळे येथे जायचे आहे का, असे विचारले. विश्वास संपादन करून आरोपींनी प्रवासाच्या बहाण्याने फिर्यादीच्या खिशातील मोबाईल फोन आणि २२,५०० रुपये रोख रक्कम चोरली. या घटनेची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला घटनास्थळी रवाना केले. पथकात पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, प्रदीप चौधरी आणि नरेंद्र मोरे यांचा समावेश होता. पथकाने सिसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. यात वसिम अजमल खान (वय ३५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) आणि जाफर उल्ला कहुल्ला कासार (वय ४२, रा. साथी बाजार, नशिराबाद) यांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान दोन्ही संशयितांनी चोरीची कबुली दिली आणि इतर दोन साथीदारांसह हा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी चोरीला गेलेला मोबाईल, २२,५०० रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे मारुती अर्टीगा चारचाकी वाहन जप्त केले. एकूण ५.२२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झाली. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा त्वरित छडा लावला

 

ताज्या बातम्या