जळगाव: लाडक्या गणरायाचे आज आगमन होणार असल्याने जळगावातील बाजारपेठ गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेली आहे. मूर्ती, पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी खरेदीला उधाण आले आहे. यंदा जिल्ह्यात एकूण २ हजार ९४६ गणेश मंडळांनी नोंदणी केली असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
शाडू मातीच्या मूर्तींना मागणी
गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे यंदाही शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. मूर्तींच्या किमतीमध्ये साधारणपणे १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली असली तरी, गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. अनेक मंडळांनी मोठ्या मूर्तींची मागणी केल्याने इतर जिल्ह्यांतूनही मूर्ती मागवण्यात आल्या आहेत.
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली
बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी विविध प्रकारची सजावटीची सामग्री उपलब्ध आहे. कागदी पताका, मोत्यांच्या माळा, मुकुट, शेले, फेटे, चमकी, विविध प्रकारचे हार, रंगीत कागद आणि आकर्षक दिव्यांच्या माळा ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, पर्यावरणपूरक कापडी फुलांच्या माळा आणि कागदी पताकांनाही मोठी मागणी आहे.
बाप्पांचा खास साजशृंगार
विक्रेत्यांनी गणरायाच्या मूर्तीसाठी खास पुणे आणि मुंबईहून विविध प्रकारचे दागिने विक्रीसाठी आणले आहेत. यामध्ये कंठीहार, चिकमोत्यांची माळ, चपला हार, डायमंड नेकलेस यांचा समावेश असून, ते १०० ते २५० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसह मंडळाचे कार्यकर्तेही आवडीने या वस्तूंची खरेदी करत आहेत.
गणेश चतुर्थीच्या आगमनाने शहरात एक वेगळाच उत्साह संचारला असून, सर्व गणेशभक्त लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.