चाळीसगावात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात सोमवारी रात्री उशिरा मोठी धक्कादायक घटना घडली. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी साडी सेंटरजवळ चौधरी यांना काही अज्ञात हल्लेखोरांनी अडवले. यावेळी कोयत्याने त्यांच्या अंगावर वार करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चौधरी यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला. घटनास्थळी एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने धुळे येथे हलवण्यात आले.
प्रभाकर चौधरी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नुकतेच दोन दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतरच झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणामागे राजकीय वैर आहे की वैयक्तिक वाद, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेमुळे चाळीसगावातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.