।। आत्मोत्कर्ष वाणी ।।
‘चारित्र्यशील होण्यासाठी आचरण बदला!’ – प. पू. डॉ. हेमप्रभाजी म. सा.
प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या चारित्र्याचा प्रभाव पडत असतो. त्याच्या वर्तनातून शील, कुळ दिसते. आपल्या मनात काही आणि आचरणात काही दुसरेच असेल तर ते चारित्र्यशील आचरण नाही. सदव्यवहार करताना शत्रुबद्दल सुद्धा मनात कपट ठेऊ नये, बोलण्या-वागण्यात शालिनता ठेवली पाहिजे, दुसऱ्यांविषयीचे मनात विचार आणि प्रत्यक्ष व्यवहार यात एकरुपता असावी. व्यक्तीपासून विचार, विचारातून मानसिकता आणि अध्यात्मिक वाणी विकसीत होते. संपत्ती फक्त श्रीमंतीने नाही तर व्यक्तीच्या आचरणानेसुद्धा समजते. प्रतिकात्मक जीवन जगणे टाळले पाहिजे. सूर्यप्रकाशाचा उपयोग फक्त आपण स्वत:ची सावली पाहण्यासाठी करत असू तर त्याचा मुख्य उपयोग आपण विसरतो. लहान मोठ्यांचा आदर, मनाची उदारता, आलोचक न बनता हितचिंतक बनले पाहिजे. चुक दाखविणे सोपे असते मात्र मोठे कार्य निर्माण करणे कठिण असते. आपल्या वचनांमध्ये दारिद्र्यता आणू नये. असे प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा. यांनी सांगितले.
डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी आपल्यातील ऊर्जा ओळखण्याचा सल्ला दिला. आपल्यातील अनंत शक्तीला जागृत करण्यासाठी सर्वात प्रथम मनातील भिती दुर केली पाहिजे. त्यानंतर आळस, अनियमितता, एकाग्रता आणि निर्णयक्षमता विकसीत केली पाहिजे. त्यासाठी ईच्छाशक्ती वाढवावी जेणे करुन कार्य सिद्धीस नेता येते. ईच्छा केली तरच संकल्प होतो. संकल्प केल्यानंतरच ध्येय निश्चित होते. एकाग्रतेतून निर्णय घेता येतो आणि शाश्वत सुखाचा आनंद मिळतो. असे त्यांनी श्रावक-श्राविकांना सांगितले.