गुढीपाडव्याच्या सुट्टीत मामाकडे आलेल्या तरुणीची आत्महत्या
पारोळा (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या सुट्टीसाठी मामाकडे आलेल्या १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोंडण येथे २८ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली. या दुःखद घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणीचे नाव पायल संतोष शिंदे (वय १८, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे असून, ती नाशिकच्या मराठा कॉलेजमध्ये इयत्ता १२वीमध्ये शिक्षण घेत होती. गुढीपाडव्याच्या सुट्टीनिमित्त ती मामाकडे भोंडण येथे आली होती.
घटनेचा संपूर्ण घटनाक्रम असा – २७ मार्च रोजी रात्री ११ वाजता कुटुंबीय जेवण करून झोपले. मात्र, २८ मार्च रोजी पहाटे ४.१५ वाजता तिचा मामा सतीश सोनवणे झोपेतून उठला असता, पायलने घराच्या छताच्या लोखंडी पाइपला खाटीच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले.
तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने तिला रुग्णवाहिकेतून पारोळा येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस नाईक जयंत सपकाळे पुढील तपास करीत आहेत.