कुसुंब्यात बेछूट गोळीबार; पाच जणांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील गणपतीनगर परिसरात शनिवारी (ता. ४) रात्री साडेदहाच्या सुमारास चंद्रशेखर त्र्यंबक पाटील या कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक बेछूट गोळीबार आणि दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. हल्लेखोरांनी प्रथम शिवीगाळ करत घराच्या दिशेने दगडफेक केली, त्यात खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यानंतर घराबाहेर उभी असलेली दुचाकीही फोडण्यात आली.
या प्रकरणी किरण खर्चे, सचिन सोनवणे, गणेश उर्फ विकी ज्ञानेश्वर, हर्षल महाडिक, निखिल चव्हाण, रवी राठोड, राकेश पाटील आणि दिनेश पवार या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पोलिसांनी शिताफीने कारवाई करत त्यापैकी पाच जणांना अटक केली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे गणपतीनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जुन्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर येत आहे.