Saturday, October 4, 2025
Homeक्राईमकामयानी रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना  ठोकल्या बेड्या !

कामयानी रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना  ठोकल्या बेड्या !

कामयानी रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून लुटणाऱ्या दरोडेखोरांना  ठोकल्या बेड्या !

साडेचार लाखांची लूट हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

जळगाव | प्रतिनिधी: कामयानी रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून ४ लाख ५० हजार रुपयांची लूट करणाऱ्या चार दरोडेखोरांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अखेर गजाआड केले. ९ सप्टेंबर रोजी घडलेल्या या दरोड्याच्या गुन्ह्यातील सर्व रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून, आरोपींना पुढील तपासासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, काही संशयित जीएस ग्राऊंड परिसरात लपूनछपून हालचाली करत आहेत. या माहितीच्या आधारे पोउपनि सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत चार संशयितांना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील विनाक्रमांक मोटारसायकलवरील पिशवीतून तब्बल ४ लाख ५० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

आरोपींची कबुली: रेल्वेत लूट करून रावेरला पलायन
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी चौकशीत आपली नावे किरण पंडित हिवरे (रा. भातखेडा, रावेर), अजय सुपडू कोचुरे (रा. खिडर्डी, रावेर), हरीश अनिल रायपूरे (रा. प्रतापपुरा, बऱ्हाणपूर) आणि गोकुळ श्रावण भालेराव (रा. डांभुर्णी, यावल) अशी सांगितली. त्यांनी कबूल केले की, ९ सप्टेंबर रोजी त्यांनी आपला पाचवा साथीदार संदीप उर्फ आप्पा शामराव कोळी (रा. डांभुर्णी, यावल) याच्यासह मिळून बऱ्हाणपूरहून जळगावकडे येणाऱ्या कामयानी रेल्वेत प्रवाशाला मारहाण करून त्याच्याकडील पैशांची बॅग हिसकावली. लूट केल्यानंतर ते रावेर रेल्वे स्टेशनवर उतरून पळून गेले. ही रक्कम वाटून घेण्यासाठी ते जळगावात एकत्र जमले होते.

लोहमार्ग पोलिसांकडे तपास
पोलिसांनी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यातील अभिलेख तपासले असता, फिर्यादी सुधाकर धनलाल पटेल (वय ६०, रा. बऱ्हाणपूर) यांच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा (सीसीटीएनएस क्र. ४५२/२०२५, कलम ३०९(६) भा.द.वि. २०२३) दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील संपूर्ण ४ लाख ५० हजार रुपये हस्तगत केले. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पथकाचे कौतुक
या यशस्वी कारवाईत पोहेकॉ प्रीतम पाटील, यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयूर निकम यांच्यासह तांत्रिक सहाय्यासाठी पोशि गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन करत त्यांच्या सतर्कतेचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे.

दरम्यान जळगाव पोलिसांनी या कारवाईद्वारे गुन्हेगारीविरुद्ध कठोर पावले उचलण्याची आपली तयारी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

ताज्या बातम्या