कंडारीत किरकोळ वादातून तरुणाचा खून
भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी जितेंद्र राजेंद्र साळुंखे-कोळी (वय ४०) या तरुणाचा भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे किरकोळ वादातून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवार (ता. ५) रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत जितेंद्र साळुंखे हा पत्नी व तीन मुलांसह जळगावात राहत होता आणि हातमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. रविवारी तो जळगावच्या माजी महापौरांचा मुलगा व आणखी दोघांसोबत कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता.
दरम्यान, ते चौघे एका हॉटेलवर थांबले असता मद्यपान करताना किरकोळ वाद झाला. वाद चिघळताच हाणामारी झाली आणि त्या दरम्यान संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत जितेंद्रचा जागीच खून केला. गंभीर अवस्थेत त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पीएसआय इकबाल सय्यद तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयितांचा शोध सुरू असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जितेंद्रच्या मृत्यूनंतर गेंदालाल मिल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.