असोद्यात तरुणाची आत्महत्या; कुटुंबीयांवर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील असोदा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार, ६ सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सागर मधुकर चौधरी (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून तो पत्नी व एका मुलासह असोदा येथे राहत होता. तर त्याचे आई-वडील नाशिक येथे वास्तव्यास आहेत. सागर किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या वेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर असोदा गावात शोककळा पसरली आहे.