नवी दिल्ली वृत्तसंस्था: -चीनमध्ये अतिशय वेगाने वाढत असलेल्या HMPV व्हायरस ने भारतात एन्ट्री केली असून आतापर्यंत सात रुग्ण देशात आढळून आले असून महाराष्ट्रात दोन रुग्ण नागपूर मध्ये आढळून आले आहेत. तसेच अहमदाबादमध्ये 1, महाराष्ट्रातील नागपूर आणि बेंगळुरूमध्ये प्रत्येकी 2, चेन्नईमध्ये 1 आणि कोलकातामधील 1 मुलाला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चे रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्र सरकारने या व्हायरसबाबत अलर्ट जारी केला आहे. तर राज्य आणि केंद्र सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या सगळ्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने लोकांना घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व रुग्णालयांना त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. नागपुरात 7 आणि 13 वर्षांच्या मुलांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आधी स्वाइन फ्लू झाला होता. त्यानंतर 3 जानेवारी रोजी PCR टेस्ट केल्यावर या दोन्ही मुलांना HMPV व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं.ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा थंडीच्या दिवसांमध्ये जास्त वेगानं पसरतो. तो फुफुस्सांमध्ये वेगानं पसरतो आणि त्यामुळे न्युमोनिया होण्याचा धोका असतो. परिणामी श्वास घ्यायलाही त्रास होते. छाती भरुन येते, लहान मुलं आणि वृद्धांना हा व्हायरस जास्त प्रभावित करतो. सगळ्यात आधी 2001 साली या व्हायरसची ओळख पटली होती. हा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याने, शिंक दिल्याने तसंच त्याच्याशी हात मिळवल्याने किंवा त्याला स्पर्श केल्यानेही पसरू शकतो. एचएमपीव्ही व्हायरसने संक्रमित झाल्याच्या पाच दिवसांनंतर या व्हायरसची लक्षणं दिसायला लागतात.
या व्हायरसची काय आहेत लक्षणे?
सर्दी, घशात खवखव, डोकेदुखी, ताप येणं, थंडी वाजणं, नाक गळणं, खोकला होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, गंभीर लक्षणांमध्ये फुफुस्सांमध्ये संक्रमण होऊ शकतं, श्वसना संदर्भातले आजार असणाऱ्यांनी खासकरून अस्थमा आणि फुफुस्सांचे आजार असणाऱ्यांनी सर्तक राहण्याची गरज आहे.