अमेरिकन फेडरल बँकेच्या निर्णयाचा परिणाम : सोन्या–चांदीच्या भावात विक्रमी उसळी
जळगाव (प्रतिनिधी) – अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदरात कपात केल्यानंतर सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी चढ-उताराची लाट उसळली असून शनिवारी २४ कॅरेट सोन्याच्या भावात तोळ्यामागे तब्बल ७५० रुपयांची वाढ झाली. तर चांदीने एकाच दिवसात ३ हजारांची उसळी घेत १,३६,९९० रुपये किलोचा सार्वकालीन उच्चांक गाठला.
जळगाव सराफा बाजारात शनिवारी शुद्ध सोन्याचा दर ₹१,१४,७९४ प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला. याआधी १६ सप्टेंबर रोजी सोन्याने ₹१,१४,८४५ या उच्चांकाला गवसणी घातली होती. विशेष म्हणजे, ट्रम्प टेरिफनंतर २१ एप्रिल रोजी सोने पहिल्यांदा १ लाखांच्या वर गेले होते. त्यानंतर सोने-चांदीचे दर सतत वाढत राहून नवनवे विक्रम करत आहेत.
चांदीबाबत बोलायचे झाल्यास, १२ सप्टेंबरला ती ₹१,३३,९०० च्या पातळीवर गेली होती. तब्बल पाच दिवस तोच भाव कायम राहिल्यानंतर शनिवारी एका दिवसात ₹३,००० ची उसळी घेत पुन्हा उच्चांकी दराला पोहोचली. पितृपक्षाच्या सुरुवातीला (८ सप्टेंबर रोजी) चांदीचा दर ₹१,२८,७५० होता, त्यानंतर फक्त १५ दिवसांत तब्बल ₹८ हजारांचा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.