अमळनेर : अमळनेर-चोपडा रस्त्यावर गुरुवारी (२८ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास अमळनेर पोलिसांनी सापळा रचून दोन संशयित तरुणांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आसाराम बापू आश्रमाजवळ ही कारवाई करण्यात आली. यात विशाल भैय्या सोनवणे (१८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भीमा भिल (३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) या दोघांना पकडण्यात आले.
दोघांकडे शस्त्र परवाना नसताना बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल आणि काडतुसे ठेवलेली आढळली. मध्यरात्री ३ वाजता आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.