शैतान पतीचा ‘कार’नामा ! पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला; कारने फरफटत नेल्याने विवाहितेची प्रकृती गंभीर
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव येथील एका विवाहितेवर तिच्या पतीने अत्यंत अमानुष आणि जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती रेवन प्रमोद पवार याने पत्नी तृप्तीवर कार चढवून तीला फरफटत नेले. या हल्ल्यात तृप्ती पवार गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील रहिवासी रेवन पवार याचे काही वर्षांपूर्वी तृप्ती पाटील हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू होता, त्यामुळे तृप्ती आपल्या मुलीसह माहेरी भडगावला राहायला आली होती.
१२ जून रोजी रेवन पवार तृप्तीच्या माहेरी येऊन तिच्याशी वाद घालू लागला. त्यावेळी त्याने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तृप्तीच्या बहिणीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, रेवनने तिच्यावरही हात उचलला. यानंतर पती रेवन पवार याने तृप्तीवर कार चढवत तिला काही अंतर फरफटत नेले. या अमानुष कृत्यात तृप्तीच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून, तिची त्वचा देखील फाटली आहे.
तृप्तीने भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रेवन प्रमोद पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला केल्यानंतर रेवन पवार घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.