शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू
जाफराबाद तालुक्यातील घटनेने शोककळा
जाफराबाद (प्रतिनिधी) – तालुक्यातील कोनड शिवारात असलेल्या एका शेततळ्यात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार, ३ जून रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूड बुद्रुक येथील जोशी कुटुंबीय सोमवार, २ जून रोजी डोलखेडा येथील ओलांडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या वेळी कुटुंबातील यश अनिल जोशी (वय १४), दिपाली रमण जोशी (वय ९), रोहण रमण जोशी (वय ७) ही तीन भावंडे अचानक बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी व गावकऱ्यांनी परिसरात शोध घेतला, परंतु ते कुठेही सापडले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी जाफराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, ३ जून रोजी सकाळच्या सुमारास, कोनड शिवारातील शेतकरी सुभाष परिहार यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात तीन्ही भावंडांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. स्थानिक शेतकऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले.
या घटनेमुळे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या तिघांचे शेततळ्यावर कसे जाणे झाले? ते पाण्यात कसे बुडाले? याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जाफराबाद पोलीस तपास करीत असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.