लायसन्स नूतनीकरणासाठी 600 रुपयांची लाच मागणारे तिघे जाळ्यात
जळगावच्या अँटी करप्शन ब्युरोची भुसावळ येथे कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) : लायसन्स नूतनीकरणासाठी ६०० रुपयांची लाच घेताना पाणीपुरवठा विभागातील तीन कर्मचारी रंगेहात पकडले गेले. अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) जळगाव विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे खळबळ उडाली असून आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
तक्रारदार प्लंबर यांनी लायसन्स नूतनीकरणासाठी भुसावळ येथील पाणीपुरवठा विभागात संपर्क साधला असता, कंत्राटी कामगार शाम समाधान साबळे (वय २८) याने ७०० रुपयांची लाच मागितली. अभियंता सतीश सुरेशराव देशमुख (वर्ग ३) यांनी फोनवर ६०० रुपये देण्यास सांगितले. साबळे याने लिपिक शांताराम उर्खडु सुरवाडे (वय ५७, वर्ग ४) यांच्यामार्फत २३ एप्रिल २०२५ रोजी लाच स्वीकारली. त्याचवेळी ACB पथकाने छापा टाकत तिघांना अटक केली.सर्व आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून, त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, आणि तपास अधिकारी नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक, यांनी सापळा पथकाचे नेतृत्व केले.
पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, दिनेशसिंह पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि प्रदीप पोळ यांचा समावेश होता.या कारवाईमुळे सरकारी विभागातील भ्रष्टाचारावर वचक बसला असून, पुढील तपास सुरू आहे.