Saturday, November 15, 2025
Homeखानदेशरोहन घुगे जळगावचे नवे जिल्हाधिकारी ; आयुष्य प्रसाद यांची नाशिक येथे बदली

रोहन घुगे जळगावचे नवे जिल्हाधिकारी ; आयुष्य प्रसाद यांची नाशिक येथे बदली

रोहन घुगे जळगावचे नवे जिल्हाधिकारी ; आयुष्य प्रसाद यांची नाशिक येथे बदली

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आयएएस अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते लवकरच जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. सध्या ते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असून आपल्या कार्यक्षमतेमुळे त्यांनी प्रशासनात विशेष ओळख निर्माण केली आहे.

माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी रोहन घुगे यांची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश मंगळवारी सायंकाळी राज्य शासनाने निर्गमित केले.

घुगे यांची शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी

मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले रोहन घुगे यांचे वडील एसबीआय बँकेत कार्यरत होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण मराठी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बी.टेक. पदवी संपादन केली आणि पुढे खासगी क्षेत्रात नोकरीस लागले. काही काळ लंडन येथे अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांना स्पर्धा परीक्षांकडे ओढा वाटू लागला.

त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत २०१५ साली असिस्टंट कमांडंट, तर २०१६ साली भारतीय वनसेवा (IFS) या पदासाठी यश मिळविले. पुढील वर्षी म्हणजे २०१७ मध्ये त्यांनी युपीएससी नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करून आयएएस पद प्राप्त केले.

प्रशिक्षणानंतर त्यांनी प्रथम वर्धा येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम केले आणि त्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. या पदावर काम करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी ‘मिशन दीपस्तंभ’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळविला.

वर्धा जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांची राज्यभर चर्चा झाली. तर अलीकडेच राज्य सरकारच्या ‘शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात ठाणे जिल्हा अग्रस्थानी राहिल्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राबविलेला ‘दिशा’ उपक्रम देखील अत्यंत यशस्वी ठरला.

नव्या जबाबदारीकडे सर्वांचे लक्ष
आता रोहन घुगे जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार असून, त्यांच्या कार्यकौशल्यामुळे जिल्हा प्रशासनात नवी ऊर्जा आणि कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या