रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईल सोनसाखळी लांबवली
जळगाव प्रतिनिधी
शहरातील बजरंग बोगदा परिसरात धक्कादायक घटना घडली असून, रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनपोत अज्ञात दुचाकीस्वार चोरट्याने धूमशैलीत हिसकावून नेली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना ११ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. अनिता राजेंद्र जैन (वय ५५, रा. प्रेमनगर) या बजरंग बोगदा परिसरातील भाजीपाला विक्री व किराणा दुकानासमोरून जात होत्या. याच दरम्यान, मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनपोत झटपट हिसकावली आणि घटनास्थळावरून पलायन केले.
चोरीनंतर महिलेने आरडाओरड केली, मात्र चोरटा काही क्षणांतच दुचाकीवरून पसार झाला होता. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी अनिता जैन यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.